तहसीलदारांनी केला ८०० ब्रास वाळू साठा जप्त
सिल्लोड, (प्रतिनिधी): तालुक्यातील भवन चिंचखेडा येथील वाळू पठ्याचा लिलाव झाला नाही मात्र दिवसरात्र या वाळू पठ्यातून जेसीबी, हायवा, ट्रॅक्टर मार्फत वाळू माफिया अवैद्य वाळू उपसा करत आहे. याची माहिती मिळाली, यानंतर सिल्लोड तहसीलदार संजय देवराये यांनी शनिवारी दुपारी ४ वाजता भवन येथील सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या जागेवर वाळू माफियांनी अवैद्य रित्या जमा करून ठेवलेला जवळपास ८०० ब्रास वाळू साठा जप्त केला.
जप्त केलेल्या वाळू साठ्याची माहिती उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना देण्यात आली आहे. ज्या वाळू माफियांनी हा वाळू साठा केला आहे त्यांच्या विरुद्ध व त्यांचे नदी पात्रात फिरत असलेले वाहने जप्त करून कठोर कार्यवाही केली जाईल. ज्या जागेवर हा वाळूसाठा करण्यात आला आहे. त्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सात बाऱ्यावर दंडाचा बोजा चढवला जाणार आहे.
तालुक्यातील वाळू माफिया विरुद्ध दोन मोठ्या कार्यवाह्या करण्यात आल्या आहे. आता पर्यंत १ हजार ८०० ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. तीन कोटींचे बोजे सातबारावर चढवले आहे. या कार्यवाहीमुळे वाळू माफिया व काही फितूर महसूल कर्मचारी माझी खोटी बदनामी करत आहे. मात्र मी कुणाला घाबरत आहे. मी अवैद्य वाळू उपसा करणाऱ्यांची गय करणार नाही. यात कितीही मोठा व्यक्ती माफिया किंवा फितूर महसूल कर्मचारी अडकला. तर त्याच्या विरुद्ध सुद्धा कठोर कार्यवाही केली जाईल अशी माहिती तहसीलदार संजय देवराये यांनी दिली.
तालुक्यातील भवन चिंचखेडा येथील लिलाव प्रक्रिया झाली. मात्र वाळू माफियांनी साखळी केल्याने ८ कोटी ५७ लाख ७७७ रुपयात पहिल्या लिलावात गेलेला पट्टा कॅन्सल झाला. त्यानंतर हा वाळू पठ्याचे दोन वेळा लिलाव झाले. पण २८ लाखांच्यावर कुणी बोली लावली नाही. परिणामी प्रशांसनाने हा पट्टा रद्द केला. पण बेकायदा दिवस रात्र वाळू माफिया या पट्यातून बेसुमार वाळू उपसा करत होते याची माहिती मिळाल्यावर सिल्लोड येथील सिंगम अधिकारी तहसीलदार संजय देवराये यांनी छापा मारून या पट्यातून उपासा करून साठवून ठेवलेला तब्बल ८०० ब्रास वाळू साठा जप्त केला. यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
-- तीन कोटींचे बोजे चढवले --
मागील महिन्यात पूर्णा, अंजना नदी पात्रातून ट्रॅक्टर, जेसीबी, हायवाद्वारे अवैद्य रित्या वाळू उपसा करून ठेवलेला १ हजार ब्रास वाळू साठा तहसीलदार संजय देवराये यांनी जप्त करून १४ लोकांच्या सातबारा वर २ कोटी ८३ लाख ३९ हजार २०० रुपयांचे बोजे चढवले आहे. त्या नंतर ही दुसरी कार्यवाही करण्यात आली. यात ८०० ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.














